सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक माणूस काही ना काही जबाबदाऱ्या पेलत असतो.
या जबाबदाऱ्या आपल्याला मनापासून हव्या असतात का?
प्रत्येक गोष्ट मनासारखी असते का?
नोकरी असो की घर, मनाप्रमाणे असेल तरच तिथे राहावं वाटतं, पण जिथे मन रमणं शक्य नाही तिथे जबरदस्ती करावीच लागते.
हे कलियुग आहे पार्थ, जिथे माणसं घरं मोठी बांधतात पण मन लहान करत चाललेत.
१. नोकरी : स्वप्नं विरुद्ध वास्तव
शिक्षण घेताना स्वप्नं मोठी असतात—छानसी नोकरी, समाधानकारक पगार, दर्जेदार जीवनशैली. पण प्रत्यक्षात नोकरी मिळाल्यावर कळतं की ही फक्त एक जबाबदारी आहे. सकाळी उठून ठरावीक वेळेत ऑफिस गाठायचं, दिवसभर साहेबाच्या सूचना पाळायच्या, मनाविरुद्ध काम करायचं, फक्त महिन्याच्या शेवटी बँक खात्यात जमा होणाऱ्या पगारासाठी.
अनेकांना त्यांच्या कामाचा कंटाळा आलेला असतो, पण स्वप्नांना सत्यात उतरवणं त्यांच्या हातात नसतं. कधी कधी तर, स्वतःला प्रश्न पडतो—ही नोकरी आपण आनंदाने करतोय का, की फक्त कर्जाच्या हफ्त्यांसाठी?
२. घर : निवारा की जबाबदारी?
घर हे माणसाच्या आयुष्यातलं महत्त्वाचं स्थान. पण तिथेही मनाला हवं तसं सगळं असतं का? घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात, तिथल्या जबाबदाऱ्या सुद्धा असतात. रोजचं स्वयंपाक, घरातील वाद, कुटुंबातील अपेक्षा—हे सगळं समजून घेणं आणि सांभाळणं हे सुद्धा एक कामच आहे.
घर म्हणजे फक्त प्रेम आणि माया नव्हे, तर अनेक न बोलता स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या. कधी कधी माणसाला घरातूनही पळून जावं वाटतं, पण सामाजिक जबाबदाऱ्या त्याला बांधून ठेवतात. आपलं मन घरात नाही, पण तिथे राहावं लागतं, कारण आपण आई-वडिलांसाठी, जोडीदारासाठी किंवा मुलांसाठी जबाबदार असतो.
No comments:
Post a Comment